महावितरणच्या अभियंत्याकडून पदाचा गैरवापर

आदिवासी बांधवांना ठेवले 35 तास अंधारात
जेएनपीटी | वार्ताहर |
चिरनेर महावितरण कार्यालयातील उपअभियंता शकील एम खाटीक यांनी आपल्या पदभारांचा गैरवापर करून चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल येथील आदिवासी बांधवांना 35 तास अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे अशा उर्मट, बेजबाबदार अभियंत्यावर कारवाई करावी आणि केळाचामाल येथील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू करावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी महावितरण कार्यालय उरणचे अति. कार्यकारी अभियंता विजय सोनावणे यांच्याकडे केली.
उपअभियंता शकील एम खाटीक यांनी आदिवासी बांधवांसाठी करण्यात आलेल्या विद्युत पुरवठ्यासाठी तात्काळ विद्युत पोल, डी.पी. उपलब्ध करुन न देता, विद्युत वाहक तारा झाडांना टांगून ठेवत आदिवासी बांधवांना विद्युत पुरवठा सुरू केला. सदर झाडांना टांगून ठेवण्यात आलेल्या विद्युत वाहक तारांमुळे आम्हा आदिवासी बांधवांच्या मुलांना 15 ऑगस्ट 2021 रोजी शॉक लागण्याची घटना घडली. यासंदर्भात उप अभियंता शकील एम खाटीक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीचा राग अंगी बाळगलेले उर्मट व कार्याशी बेजबाबदार असणारे उप अभियंता शकील एम खाटीक हे जाणून बुजून आम्हा आदिवासी बांधवांना नाहक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात गुरुवार दि 28 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 9 वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा शुक्रवार, दि 29 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 11 वाजेपर्यंत सुरू न झाल्याने आम्ही आदिवासी बांधवांनी चिरनेर महावितरण कार्यालयाकडील कर्मचारी वर्गाकडे तक्रार केली.
उप अभियंता शकील एम खाटीक यांना खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली. खाटीक साहेबांनी सांगितले की तुम्ही बिले भरा मग विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल.परंतु आम्ही आदिवासी बांधव न चूकता विद्युत बिल भरत असतानाही आमच्यावर आदिवासी म्हणून हा अन्याय का असा सवाल उरण महावितरण कार्यालयातील अति कार्यकारी अभियंता विजय सोनावणे यांना विचारणा केली असता, त्यांनी उप अभियंता शकील खाटीक यांची पाठराखण करत आम्हा आदिवासी बांधवांना अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम हाती घेतले आहे.

Exit mobile version