भारताच्या दीपिका-हरिंदरपालचे यश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून, भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. दीपिका पल्लीकलने चीनमध्ये सातासमुद्रापार देशाची शान वाढवली आहे. तिने स्क्वॅश मिश्र दुहेरीत चमकदार कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. अव्वल मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत द्वितीय मानांकित मलेशियाच्या जोडीचा 2-0 असा पराभव केला. दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंग यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.
दीपिकाची आशियाई स्पर्धेतील कामगिरी चमकदार राहिली आहे. तिने या पर्वात आतापर्यंत भारताला 2 पदके मिळवून दिली. दीपिकाने सांघिक स्पर्धेत प्रथम 2 कांस्यपदकं जिंकली आणि आता मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्ण जिंकले. दीपिकाचे हे एकूण सहावे पदक आहे. तिला आतापर्यंत एकाही स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यात यश आले नव्हते. पण, यावेळी दीपिकाने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला.
दीपिका पल्लीकलने 2010 मध्ये पहिले पदक जिंकले होते. कांस्य पदक जिंकून दीपिकाने पदकांचे खाते उघडले. यानंतर 2014 मध्ये 1 रौप्य, 2 कांस्य, 2018 मध्ये 1 कांस्य आणि आता तिने सुवर्ण जिंकले. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.