| निंगबो | वृत्तसंस्था |
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दुहेरी विभागातील लढतींना सुरुवात झाली. यावेळी भारताच्या दोन जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, ध्रुव कपिला-तनीषा क्रॅस्टो या जोडीने प्रतिस्पर्धी जोडीवर विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. त्यामुळे भारतीय खेळाडूंना संमिश्र यशाचा सामना करावा लागला.
ध्रुव कपिला व तनीषा क्रॅस्टो या जोडीने विजयाला गवसणी घालून दिलासा दिला. ध्रुव कपिला-तनीषा क्रॅस्टो या जोडीने पी. होर्बानल्यूकीट- बेनयापा एमसार्ड या थायलंडच्या जोडीचे कडवे आव्हान 21-14, 11-21, 21-15 असे तीन गेममध्ये परतवून लावले. 51 मिनिटांच्या झुंजीनंतर भारतीय जोडीने विजयावर मोहर उमटवली. सलामीच्या लढतीत रोहन कपूर-गद्दे ऋत्विका शिवानी या भारतीय जोडीला गोह सून हूट-लेई शेवोन जेमी या मलेशियन जोडीकडून 13-21, 19-21 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे या भारतीय जोडीचा 34 मिनिटांमध्ये पराभव झाला. त्यानंतर अशीथ सूर्या-अमृता प्रमुथेश या भारतीय जोडीचाही पहिल्या फेरीच्या लढतीत पराभव झाला. मलेशियाच्या वोंग टीएन की व लिम चिऊ सिएन या जोडीने भारतीय जोडीला 21-16, 5 21-15 असा निराशेचा सामना करावा लागला. या भारतीय जोडीचा 31 मिनिटांमध्ये पराभव झाला.त्यामुळे पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणोय, आयुष शेट्टी यांच्या खांद्यावर भारताची मदार असणार आहे. तसेच, महिला एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधू, तन्वी शर्मा, उन्नती हूडा, मालविका बनसोड यांना आपली चमक दाखवावी लागणार आहे.







