| अलिबाग | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. सध्या दोन्ही गटाने आपलाच पक्ष मूळ असल्याचा दावा केला आहे. आपल्याकडेच पक्षाची दावेदारी असल्याचंही म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही गटाने निवडणूक आयोगात धावही घेतली आहे. तर अजित पवार गटाच्या विधान परिषदेतीला पाच आमदारांवर कारवाई करण्यासाठी शरद पवार गटाने विधान परिषदेच्या उपसभापतींकडे धाव घेतली आहे. यामध्ये खा. सुनिल तटकरे यांचे पुत्र आ. अनिकेत तटकरे यांचाही समावेश असल्याने तटकरे कुटूंबियांचे टेन्शन वाढलं आहे. ऐन गणेशोत्सवात कारवाईची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून अनिकेत तटकरेंना गणपती पावणार कि, नाही अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे यांनी कन्या आदिती तटकरे व मुलगा अनिकेत तटकरे यांच्यासह अजित पवार गटात उडी मारली. एकेकाळी खा. शरद पवार यांचे विश्वासू कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जात होते. त्यांनीच निव्वळ फायद्यासाठी शरद पवारांच्या पाठीत खंजिर खुपसल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. तर त्यांची कन्या आदिती तटकरे यांना राज्यमंत्री पद मिळाल्याचा आ. गोगावलेंना धक्का बसला होता.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही गटाकडून आपलीच राष्ट्रवादी खरी असल्याचं सांगितलं जात आहे. बरं दोन्ही गटाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. एकत्र चहापाणीही घेत आहेत आणि नंतर पक्षावर दावाही सांगत आहेत. त्यामुळे सर्वचजण बुचकळ्यात पडले आहेत.
अनिकेत तटकरेंना बजावणार नोटीस?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे आ. सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली होती. तर जितेंद्र आव्हाड यांनी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या आमदारांनी बाजू मांडावी म्हणून त्यांना नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात त्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आ. अनिकेत तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र म्हसळा येथील बैठकित ते व्यस्त असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.