पावसाच्या सरींसोबत गौरीचे आगमन
| अलिबाग | प्रतिनिधी |
पावसाने जोर धरल्याने ऐन गौरीच्या स्वागताला सरीवर सरी पडू लागल्या. सतत पाऊस सुरु राहिल्याने या आनंदात विरजन पडले आहे. तरीदेखील पावसावर मात करीत अनेक सुवासिनींनी गौरीचे जल्लोषात स्वागत केले.
पावसाने अनेक दिवस विश्रांती घेतली होती. दिर्घ विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. जिल्ह्यामध्ये 19 सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले. पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढल्याने पावसाच्या सरीत दीड दिवसाच्या गणरायाला भावपपूर्ण निरोप देण्यात आला. गुरुवारी जिल्ह्यामध्ये गौरीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी घरोघरी सुरु होती. परंतु गेली चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढल्याने गौरीचे स्वागत जल्लोषात करण्यास अडथळे निर्माण झाले. पावसाची संततधार सुरु राहिल्याने गौरीला घरी थाटामाटात आणताना सुवासिनींना अनेक अडचणींना सामना करावा लागला.
त्या अडचणीवर मात करीत सुवासिनींनी गौरीचे स्वागत केले. त्यानंतर काही ठिकाणी मुखवटा, काही ठिकाणी मुर्तीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. भाजी भाकरीचे नैवेद दाखवून मनोभावे पुजा करण्यात आली.
22 सप्टेंबरपर्यंत ग्रीन अलर्ट
रायगड जिल्ह्यामध्ये ऐन सणासुदीत पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. े जिल्ह्यात गेली अनेक दिवसांपासून पाऊस सतत पडत आहे. गणेशोत्सवाची धुम सध्या सुरु आहे. मात्र पावसाने जोर धरल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजन पडू लागले आहे. नवनवीन कपडे परिधान करून देखील गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 सप्टेंबर रोजी दिवसभर पाऊस सुरुच राहिला. रात्री पावसाने जोर धरल्याने अनेकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता आला नाही. 22 सप्टेंबरपर्यंत ग्रीन अर्लट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडांसह रिमझीम पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.