| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील खोपटे, पाटीलपाडा येथील शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे. गेल्या 82 वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरु असताना येथे शंकराच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या अनोख्या पारंपारीक उत्सवामुळे जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जुणे गौरामंडळ आहे. या शिवगौऱ्यांच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील भाविक येत असतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला या गौऱ्याचे विसर्जन केले जाते. संपूर्ण खोपटे ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सगळ्या गावातील लोक या उत्सवात मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.
1941 साली खोपटे पाटीलपाडा येथील रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोशा पाटील, विश्वनाथ नामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाउ बाळाराम भगत,दादु सावळाराम पाटील, जगन्नाथ हसूराम पाटील अशा वीसजणांनी खोपटे पाटीलपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना करत असत कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले. त्यानंतर दहा वर्षापूर्वी येथे परेशशेठ देडीया यांच्या अर्थिक मदतीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे अंत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आहे. तेव्हापासून या मंदिरातच शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जाते.
दरवर्षी गणेशाच्या स्थापनेनंतर येथील शिवमंदिरात गौऱ्याची स्थापनेबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथाप्रसंगाद्वारे संदेश देणारे देखावे आणि शंकराची मुर्ती फक्त शाडूच्या मातीपासूनच बनविलेली असते. पहिल्या दिवशी महिलांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही. या मंडळातर्फे सतत पाच दिवस सांस्कृतीक कार्यक्रम, भजन किर्तन, गोंधळ, महिलांचे तसेच पुरूषांचे पारंपारिक नाच यासारखे कार्यक्रम सतत असतात. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 82 वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधुन नाच झाल्या शिवाय या उत्सवाची सांगता होत नाही. नवसाला पावणारा अशी या गौऱ्याची ख्याती आहे. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गौरा अंगात संचारून दृष्टांत देत असल्याची येथील गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे.