आ. बालदी अकार्यक्षम, खा. बारणे स्वार्थी!

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रखडलेली गावठाण वाढ, स्थानिक तरुणांचा रोजगार आणि वाहतूककोंडी या प्रश्नांवरून रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील यांनी भाजपचे आमदार महेश बालदी आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अकार्यक्षम आमदार आणि स्वार्थी खासदार यांच्या नाकर्तेपणामुळे उरण तालुका विकासापासून वंचित राहिल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करून गावठाण विस्ताराला मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही अद्याप शासन निर्णय (जीआर) निघालेला नाही. परिणामी, 12.50 टक्के जमिनीच्या वाटपातून प्रकल्पग्रस्तांच्या घरांची जागा कापली जात आहे. या प्रश्नावर आमदार आणि खासदारांनी शासनदरबारी पाठपुरावा करणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी काहीही केलेले दिसत नाही, असे पाटील म्हणाले.

उरणमधील वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग आणि गुटख्याची सर्रास विक्री यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हजारो कंपन्या असूनही स्थानिक तरुणांना रोजगारात डावलून बाहेरील उमेदवारांना संधी दिली जात आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी पार्किंगची कंत्राटे आणि दादरपाडा परिसरातील जमिनींच्या व्यवहारांत काही जण अधिक रस घेत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागरिकांनी आणि गावांनी या संघर्षाला सहकार्य करावे. सिडकोने ठरवलेली जमिनीची किंमत कमी करण्यासाठीही एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. एल.बी. पाटील यांनी केले.

Exit mobile version