। मुंबई । प्रतिनिधी ।
एकिकडे लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना पंधराशे रुपये दिले. तर दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणार्या वस्तुंच्या, वाहतूकीच्या दरात वाढ केली आहे. सरकारच्या या दुटप्पी वागणूकीबद्दल अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अशातच नव्या वर्षात राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसगाड्यातून प्रवास करताना सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार येणार आहे. एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. महामंडळाच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अमंलबजावणी नव्या वर्षात अर्थात जानेवारी 2025 पासून होण्याचे संकेत महामंडळाचे अध्यक्ष आ. भरत गोगावले यांनी दिले आहेत.
भंडारा विभागातील अपघात आणि कुर्ला बस अपघाताच्या धर्तीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र वाहतूक भवन येथे तातडीची बैठक बोलावली होती. यात बस पुरवठादारांसह एसटीचे वरिष्ठ अधिकारी तसेच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटी अपघात रोखण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण, मानसिक आरोग्य आणि वाहनांचे तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसूत्रीवर भर देणार असल्याचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले.
दररोज 55 लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली 76 वर्ष काम करीत आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.
चालकांना प्रशिक्षण
सध्या एसटी महामंडळाच्या चालकांना अपघात होऊ नये यासाठी दर 6 महिन्याला उजळणी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसिक आरोग्या बरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते. तसेच कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. हित पध्दत एसटीकडे कार्यरत असलेल्या खाजगी चालकांना देखील वापरण्याच्या सुचना अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.
बस पुरवठादारांना कारणे दाखवा नोटिस
सध्या एसटी महामंडळाकडे 14 हजार बसेस असून, उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपुर्या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अंत्यत जुन्या झाल्या आहेत. तसेच काही बसेस कालबाहय होण्याच्या उंबरठयावर आहेत. ही वसुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थानी नविन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापी, त्या संस्था बसेस पुरविण्या बद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवून द्यावी, असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले.