वरसोली समुद्रावरील बंधार्याच्या दुरुस्ती करण्याचे दिले आश्वासन; नागरिकांमध्ये समाधान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्याची दुर्दशा झाली असून त्याच्या दुरुस्तीकडे शासन लक्ष देत नसल्याने येथील कोळी समाजाने एकत्रित येत शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांना साकडे घातले होेते. प्रकृती ठिक नसतानाही आ. जयंत पाटील यांनी स्वतः व्हिलचेअरवर वरसोली समुद्रकिनारा गाठला आणि बंधार्याची पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्यांसोबत संपर्क साधून त्वरीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच नादुरुस्त बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कोळी बांधवाना दिले. तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नातून वरसोली समुद्रकिनार्यावर धुप संरक्षक बंधारा बांधण्यात आला होता. ग्रोयंस पद्धतीच्या या बंधार्यामुळे वरसोली समुद्रकिनार्याची होणारी धुप थांबून कोळीवाड्याला संरक्षक कवच निर्माण झाले होते. मात्र अलिकडे उधाणाच्या लाटांच्या मार्यामुळे बंधारा नादुरुस्त झाला आहे.
याबाबत कोळी समाजाने वारंवार मागणी करुनही शासन त्याकडे डोळेझाक करीत होते. शेवटी वरसोली कोळीवाडा येथे कोळी समाजाचे पाटील, पंच तसेच नाखवा संघाचे चेअरमन, विविधी सोसायटीचे चेअरमन, खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, मार्तंड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशा सर्वांनी एकत्र येत वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांच्या सहकार्याने आ. जयंत पाटील यांना साकडे घालत अन्याय निवारण्याची मागणी केली होती. ही गोष्ट कानावर येताच कोळी समाजाच्या हाकेला साद देत प्रकृती ठिक नसतानाही कसलाही विचार न करता आ. जयंत पाटील यांनी कोळी समाजासाठी व्हिलचेअरवरच समुद्रकिनारी धाव घेतली.
यावेळी त्यांनी समुद्रावरील बंधार्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्वरित संदर्भित अधिकारी वर्गासोबत प्रत्यक्ष बोलणी करून पंचनामा करून घेण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व कोळीबांधवांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आ. जयंत पाटील यांच्या तात्काळ हालचालींमुळे कोळी समाजाने त्यांना धन्यवाद दिले. यावेळी वरसोली कोळी बांधवांचा एकोपा पाहून जयंत पाटील यांनी अशीच एकी कायम ठेवण्याची आवाहन केले.