| पिंपरी | प्रतिनिधी |
चिंचवडचे आ. लक्ष्मण जगताप (वय 59) यांचे मंगळवारी (दि.3) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. जूनमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप हे आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आदींनी शोक प्रकट केला आहे.
पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर आदी पदांवर त्यांनी काम केले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच 2014 ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.