‘आचारसंहिता’ धाब्यावर बसवून आमदारांचा कार्यक्रम

तहसिलदार अनभिज्ञ; दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ?
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जे कायदा तयार करतात तेच जेव्हा कायदे पायदळी तुडवतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अशा नेत्यांकडून नेमका काय आदर्श घ्यावा, असा प्रश्न अलिबाग तालुक्यात चर्चिला जात आहे. रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या 5 नोव्हेंबरला होणार असून या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र आचारसंहितेचे नियम पायदळी तुडवत आ. महेंद्र दळवी यांच्यासह खंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवार व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत 28 कोटी 66 लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन केले.

खंडाळा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहिर झालेली असताना मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. असे असताना हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे आ. महेंद्र दळवींसह सरपंचपदाचे उमेदवार अशोक थळे तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.
याशिवाय या कार्यक्रमाबाबत परवानगी घेण्यात आली होती का, हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे कायद्याचे नियम हे फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच का..? असा सवाल उपस्थित होत आहे. आचारसंहितेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हा कार्यक्रम घेण्यात आला असून आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तहसिलदार अनभिज्ञ
आचारसंहिता लागू असताना खंडाळे येथे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी आ. महेंद्र दळवी यांनी विकासकामांचे उद्घाटन केले. याबाबत अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील यांना विचारणा केली असता त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि निवडणूक होणाऱ्या खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक आमदार विकासकामांचे उद्घाटन करतात आणि याबाबत तहसिलदारांना कोणतीही माहिती नसणे, ही शोकांतिका आहे. तसेच आमदारांच्या दबावाखाली तर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत नाही ना, असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

आमदारांवर तात्काळ कारवाई करा – ॲड. मानसी म्हात्रे
खंडाळा ग्रामपंचायत निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. असे असताना या ग्रामपंचायत हद्दीत मतदारांना आमिष दाखविण्याचे काम आमदार करीत आहे. ही बेकायदेशीर बाब असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. आमदार हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनीच आचारसंहितेचं उल्लंघन करणं चुकीचं आहे. ऐन निवडणूकीच्या काळात विकासकामांचे उद्घाटन करुन मतदारांना भूरळ पडू शकते. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी आमदार त्यांचा वेगळा चेहरा जनतेसमोर आणू पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, तसेच खंडाळे ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द व्हावी.

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबत कळविले होते. मात्र कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. नेमका काय कार्यक्रम होता, याबाबत माहिती नाही. यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांच्याकडे चौकशी करुन अहवाल आल्यानंतरच ही घटना आचारसंहितेचा भंग करणारी आहे का, नाही हे सांगता येईल.

विक्रम पाटील, तहसिलदार, अलिबाग
Exit mobile version