आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

महिलांना शिलाई मशीन, घरघंटीचे आश्वासन हवेतच?

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याचा आरोप उरणमध्ये पुन्हा एकदा पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा उपाध्यक्ष अस्लम लियाकत कल्याणकर यांनी भाजप आमदार महेश बालदी यांच्यावर ‌‘जुमलेबाजी‌’ केल्याचा घणाघाती आरोप केला आहे.

कल्याणकर यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी सुमारे सात ते आठ हजार महिलांकडून शिलाई मशीन व घरघंटी देण्याच्या नावाखाली अर्ज भरून घेण्यात आले होते. स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत महिलांना प्रलोभन दाखवण्यात आले. मात्र, निवडणूक पार पडून अनेक महिने उलटूनही महिलांना अद्याप कोणतीही साधने मिळालेली नाहीत, त्यामुळे ही केवळ निवडणुकीपुरती ‌‘जुमलेबाजी‌’ असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, शिलाई मशीन व घरघंटी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांनी वारंवार आमदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. यामुळे संबंधित महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, आश्वासनांबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे.

याबाबत आमदार महेश बालदी यांनी लवकरच वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version