अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कणकवली | प्रतिनिधी |
शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं फेटाळला. यामुळं त्यांची अटक आता निश्चित मानली जात आहे, परंतू नितेश राणे हे अज्ञातवासात असून अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. दरम्यान, नितेश राणे यांचे वकील आता हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन दिवसापासून सेशन्स कोर्टात ही सुनावणी सुरु होती.
या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी नितेश राणे यांचे मोबाईल फोन जप्त करायचे असल्यानं त्यांना कस्टडीची गरज आहे. त्यामुळं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याचं कोर्टानं म्हटल्याचं नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर हायकोर्टात जर अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असेल किंवा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असेल तर पोलिसांपासून दूर राहण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार संबंधित व्यक्तीला असतो. त्यामुळं तो ऑप्शन आमच्याकडे कायदेशीररित्या आहे. त्यामुळं नितेश राणे यांनी पोलिसांसमोर हजर होण्याची गरज नाही. पण जर आम्हाला वाटलं हायकोर्टात जायचं नाही आणि सरेंडर व्हायचं तर तो पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे, अशी माहिती अॅड. संग्राम देसाई यांनी सांगितलं.
पोलीस तपासासाठी सहकार्य
नितेश राणे यांनी यापूर्वी तपासात सहकार्य केलेलं आहे. यापूर्वी 25 डिसेंबर रोजी नितेश राणे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आपला जबाबही नोंदवला आहे. त्यामुळं यापुढेही जेव्हा कोर्ट आम्हाला काही निर्देष देईल किंवा पोलीस तपासासाठी मदत मागतील तेव्हा आम्ही त्यांना मदत करु, असंही नितेश राणे यांचे वकील देसाई यांनी स्पष्ट केलं.
हायकोर्टात जाण्याचा पर्याय आमच्याकडे आहे. यासंदर्भात चर्चा करुन आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. हायकोर्टाची प्रक्रिया ही थोडी वेळखाऊ असल्यानं आम्ही उद्या जरी हायकोर्टात गेलो तरी पुढे शनिवार-रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यानं आमची फाईल बोर्डवर येण्यास सोमवार किंवा मंगळवार उजाडेल, अर्थात या दिवशीच यावर सुनावणी होऊ शकेल
संग्राम देसाई,राणे यांचे वकील