| चिरनेर | प्रतिनिधी |
उरणची आमदारकीची जागा शेतकरी कामगार पक्षाची आहे. दत्ता पाटील यांनी वीस वर्षे, मीनाक्षी पाटील यांनी पंधरा वर्षे, डी.बी. पाटील यांनी वीस वर्षे, तर विवेक पाटील यांनी पंधरा वर्षे आमदार म्हणून विधानसभेत येथील जनतेचे प्रतिनिधीत्व केले. मागील निवडणुकीत चुकून गेलेली आमदारकी पुन्हा खेचून आणायची आहे, असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये प्रीतम म्हात्रे हे सर्वाधिक मतांनी आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उरण मतदारसंघातील विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे.एम. म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरण येथील नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, वाजेकर शेठ यांनी या भूमीत गोरगरिबांची कामे केलेली आहेत. मिठागर कामगारांची कामे केली आहेत. त्या कामाचा इतिहास कोणी पुसत असेल, तर तो पुसला जाणार नाही. असं सांगून आगरी वाईट आहेत, कडवे आणि चिकट आहेत. हे कोणी लिहिलं तर ते ब्रिटिशांनी लिहिलं आहे. ब्रिटिश अधिकारी सांगतात, की भारतात कोणाच्याही नादी लागा. पण, महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील आगर्यांच्या नादी लागू नका. ही भूमी आगर्यांची आहे. इथे आगरीच जमणार आणि इथला आमदारही आगरीच होणार. आगर्यांना हिणवण्याचं किंवा तुच्छ लेखण्याचे कोणी काम करत असेल तर ते चालणार नाही. असे सांगून आपले चारही उमेदवार विधानसभेत दिमाखात पाठवायचे आहेत. प्रीतम म्हात्रे, जे.एम. म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केलेली आहे.
अलिबाग, पेण, पनवेलमध्ये चित्रलेखा पाटील, अतुल पाटील आणि बाळाराम पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उद्या होणारी तिसरी मुंबई या ठिकाणीचे जे दलाल आहेत, त्यांनी आपल्याला फसवले आहे. तिसरी मुंबई येत आहे. तिचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला चारही उमेदवार विधानसभेत पाठवायचे आहेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला उरणच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.