विस्तार रखडल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज

। नागपूर । प्रतिनिधी ।
राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेधनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा सत्ताधार्‍यांमधील मंत्रिपदासाठी उत्सुक आमदारांना होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता वाढली आहे. 19 ते 29 डिसेंबर दरम्यान अधिवेशन संपन्न होईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुढे गेल्यानं शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढली आहे.

कॅबिनेटचा विस्तार करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही. मात्र यामुळे भाजपच्या मंत्र्यांची अडचणदेखील वाढली आहे. ममंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्यानं सध्या अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. अशा परिस्थितीत हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्‍नांना सामोरं जाणं कठीण होणार आहे, असं एका मंत्र्यानं सांगितलं.

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 ऑक्टोबरला सांगितलं होतं. मात्र अधिवेशन तोंडावर येऊनही अद्याप विस्तार झालेला नाही. तो अधिवेशनानंतरच होणार असल्याचं जवळपास निश्‍चित झालं आहे. 25 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीला गेले होते. त्यावेळी त्यांनी नागपुरलादेखील भेट दिली. मात्र त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख सांगितली नाही. योग्य वेळी होईल, असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. फडणवीसांनी विस्ताराबद्दल बोलून दीड महिना उलटला आहे. अधिवेशन 4 दिवसांवर आले आहे. मात्र विस्ताराची शक्यता दिसत नाही.

शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मागील विस्तारानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी उघड बोलून दाखवली होती. रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांनादेखील मंत्रिपदाची आस आहे. ठाकरेंविरुद्धच्या बंडात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बडनेर्‍याचे आमदार रवी राणा यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालसावरून त्यांनी रान पेटवलं होतं. त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

शिंदे गटासोबत गेलेले अपक्ष आमदार, भाजपमधील अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाळी अधिवेशवाच्या 10 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या आधीही मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र सध्या तरी विस्ताराची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत.

Exit mobile version