| रायगड | खास प्रतिनिधी |
मार्च महिना सुरु होताच अलिबाग येथील स्थानिक आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाई निवारण्यासाठी पहिला टँकर सुरु करण्यात आला आहे. अलिबाग-मुरुड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा आमदारांनी कायम केला आहे. मात्र, आमदारांच्या मतदारसंघातील अलिबाग तालुक्यातील बोडणी, रांजणखार-डावली या दोन गावांतील 5 हजार 439 नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर आपल्या मतदारसंघात विविध विकासकामांसाठी कोट्यवधीं कामांची आश्वासने आ. दळवी गेल्या दोन महिन्यांपासून देत आहे. मात्र आ. दळवींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोडणी, रांजणखार-डावली या गावात भीषण पाणी टंचाई असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.
गावात तीव्र पाणीटंचाई असून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ ओढावली आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे. गावात अनेक विकासकामे केल्याचा दावा केला जात आहे. तरीही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने आमदारांच्या निष्क्रियतेवर चर्चा सुरु झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन कोटी 51 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अलिबाग तालुक्यातील बोडणी आणि रांजणखार डावली या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. शासनाच्या आकडेवारीनूसार (दि.11) मार्चपर्यंत रायगड जिल्ह्यात कुठेही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. तर संपूर्ण कोकणात केवळ पालघर जिल्ह्यातील 6 गावे 27 वाड्यांसाठी 13 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच कोकण विभागातील पालघर वगळता रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली नाही. असे असताना केवळ आ. दळवींच्या दुर्लक्षामुळे अलिबाग तालुक्यातील दोन गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून सध्या त्याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावात पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे चांगलेच हाल होत आहेत. पाण्याचा टँकर पुरत नाही तर पाण्याशिवाय पान हलत नाही, अशी या गावातील पाण्याची परिस्थती आहे. पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे, पण पाणी काही मिळत नाही, अशी प्रतिक्रिया या गावातील महिलांनी व्यक्त केली आहे.
बोडणी गावामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष करुन महिलांची पायपीट होत आहे. काही ग्रामस्थ विकतचे पाणी आणून आपली गरज भागवत आहेत. तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांचे काय झाले. ती लवकर पूर्ण करुन पाण्याची व्यवस्था करावी.
अंबर नाखवा,
अध्यक्ष,
बोडणी ग्रामस्थ मंडळ
स्थानिक पातळीवरुन टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त होत असतात. त्यानुसार तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात येतो. त्यानुसार सध्या अलिबाग तालुक्यातील बोडणी आणि रांजणखार-डावली येथे पाणीटंचाई निवारण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
दत्तात्रय महाले,
शिरस्तेदार, प्रांताधिकारी कार्यालय, अलिबाग