आमदारांचा शब्द गेला खड्ड्यात!

आता आमदार या खड्ड्यांमध्ये लोळणार का?

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग विधानसभा संघातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना तारेवरची कसरत करण्याची वेळ चालकांवर आली आहे. मतदारांना विकासाचे आमिष दाखवून आमदार झालेले दळवी आता कुठे गेले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांसह अलिबाग-पेण, अलिबाग-मुरूड मार्गावरील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यातून प्रवास करताना अपघात होण्याची भीतीदेखील निर्माण झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे, अशी स्थिती आहे. विद्यमान आमदारांनी मतांची झोळी भरण्यासाठी निवडणुकीपूर्वी आश्वासनांची यादीच तयार केली होती. मला फक्त एकदा आमदार करा, सर्व रस्ते चकाचक करतो. खानाव येथील जाहीर सभेत बोलताना या रस्त्याकरिता शासनाकडून निधी नाही दिला तरी स्वतःच्या पैशाने रस्ता करतो, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे मतदारांनी विश्वासाने मतदान करून दळवी यांना निवडून दिले. मात्र, अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्ते आजही खड्ड्यात आहेत.

शासनाकडून पैसे आले की फक्त मलिदा खाल्ला? करोडो रुपयांचा निधी आणला असल्याच्या बाता मारल्या. मात्र, हा निधी नक्की गेला कुठे, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version