आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी

शासकीय कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; रेवदंडा पोलिसांकडून अटक

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील आंदोशी येथे अवैध माती उत्खनन प्रकरणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर भरदिवसा हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिंदे गटाचा कार्यकर्ता आमदार महेंद्र दळवी यांचा निकटवर्तीय मानला जाणारा वरंडे ग्रामपंचायतीचा माजी सरपंच सुधीर धर्मा चेरकर याला सोमवारी (दि.25) रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांची फूस असल्याने आरोपी सुधीर चेरकरला कायद्याचा धाक राहिला नसून, त्याची गुंडगिरी वाढत चालल्याची चर्चा परिसरात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाचे चौलचे मंडळ अधिकारी सुदर्शन दत्तात्रेय सावंत हे रविवारी (दि.24) आंदोशी येथील राजेंद्र शिवराम चेरकर यांच्या शेतात सुरू असलेल्या कथित अवैध माती उत्खननाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोणताही वैध परवाना अथवा रॉयल्टी नसताना माती उत्खनन करणारे सराई येथील दिलीप लक्ष्मण शेळके यांना शासनाच्या दंडात्मक कारवाईबाबत माहिती देत होते.

याचवेळी सुधीर चेरकर घटनास्थळी आला आणि पूर्वीच्या एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा राग मनात धरून त्याने सुदर्शन सावंत यांना शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली. “मागच्यावेळी पण तू मार खाल्लास, तुझ्यामुळे मला कोर्टात शिक्षा झाली, आता तुझा गेम करतो,” असे म्हणत त्याने सावंत यांची कॉलर पकडून मारहाण केली. तसेच “पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर संध्याकाळपर्यंत तुझा मर्डर करून टाकीन,” अशी उघड धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली.

विशेष म्हणजे, सुधीर चेरकर याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, मारामारी, धमकी, दंगल, अतिक्रमण, तसेच रेवदंडा ग्रामीण रुग्णालयातील एका महिलेला मारहाण केल्याच्या प्रकरणाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवरच भरदिवसा हल्ले होत असतील तर प्रशासनाचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आरोपी सुधीर चेरकरला आमदारांकडून वारंवार राजकीय संरक्षण मिळत असल्याने त्याची हिंमत वाढली असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. रविवारी झालेल्या गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यात उशीर झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर आंदोशी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.

Exit mobile version