| महाड | प्रतिनिधी |
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर आरोपीची न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर पोलीस बनवाबनवी करत चुकीच्या व्यक्तींना आरोपी करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
याबाबत हकीकत अशी की, काहीच दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी त्यांच्या पुणे येथील कार्यालयात फोन करून दिली होती. धमकी देणाऱ्या इसमास अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमने महाडमधून तात्काळ अटक केली होती. दरम्यान, दारू पिऊन धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. भुजबळांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपदेखील सर्वत्र व्हायरलही झाली असून, धमकी देणाऱ्या इसमाचे नाव प्रशांत पाटील असे सांगण्यात आले होते. महाड नवेनगर येथून त्याला अटक करून अधिक तपास सुरू होता. परंतु, आज कोर्टात हजर केले असता या तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.