चाकण, घोडनदी, कल्याण, शिरूर, देवनार येथून बोकड बाजारात दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
गटारी म्हटले की मांसाहार खवय्यांची वेगळीच मजा असते. यंदा श्रावण येत्या 18 जुलैपासून सुरु होणार आहे. त्याअगोदर रविवारी मटणावर ताव मारण्याची तयारी जिल्हाभरात सुरू झाली आहे. चाकण, घोडनदी, कल्याण, देवनार, बडोद येथून गटारीसाठी सुमारे वीस हजार बोकड जिल्ह्यातील बाजारात गेल्या आठ दिवसांपासून दाखल झाले आहेत. या बोकडांची रविवारी कत्तल होणार आहे.
श्रावण सुरु झाल्यावर महिनाभर तरी मांसाहाराचा आनंद घेतला जात नाही. श्रावण सुरु होण्याच्या अगोदरच दीप अमावास्येच्या दिवशी गटारी साजरी केली जाते. या कालावधीत मटण, चिकन मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. यातून मटण विक्रेत्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. यावर्षी श्रावण 18 जुलैपासून सुरु होणार आहे. त्याअगोदर गटारी साजरी करण्यासाठी मासांहार खवय्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासूनच अलिबागसह अनेक बाजारात बोकड, बकरे दाखल झाले आहेत. चाकण, घोड नदी, कल्याण व देवनार येथील बाजारपेठेतून ते आणण्यात आले आहेत. अलिबागसह अनेक मटण विक्रेत्यांच्या दुकानात बोकड, बकऱ्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, पडलेला पाऊस, अशा अनेक कारणांमुळे बाजारात बोकड, बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे बोकड, बकऱ्यांच्या दरात सुमारे दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे. बोकड, बकरे वाहतूक करण्याच्या टेम्पोचे भाडे वाढले आहे. मात्र, या महागाईची झळ सहन करीत ग्राहकांना योग्य दरात बोकड, बकऱ्यांचे मटण दिले जाणार आहे. यंदा मटणाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. प्युअर मटण 760 व मिक्स मटण 680 रुपयांना विकले जाणार असल्याचे अलिबाग तालुका बकरे मटण खाटीक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र नखाते यांनी सांगितले.
गावांमध्ये जोरदार तयारी
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून गावांमध्ये शेळीपालन व्यवसाय वृंद्धिगत होऊ लागला आहे. अनेक तरुण शेळीपालन व्यवसायाकडे वळू लागले आहेत. त्याततून हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. गावागावात बोकड पालन केले जात असल्याने गटारीच्या पार्श्वभूमीवर बोकड कापण्याचा ट्रेंड वाढत आहे. यंदाही बोकड कापून वजनानुसार वाटा घेण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याचे नियोजन गावपातळीवर सुरु झाले आहे.
गटारीला रविवार आल्याने मटण खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नियोजन केले असून, मागणीनुसार मटण उपलब्ध केले जाईल. बोकड बकऱ्यांच्या किंमती वाढल्या असल्या तरीही यंदा मटणाच्या दरात वाढ न करता स्थिर ठेवले आहेत.
महेंद्र नखाते, अध्यक्ष, अलिबाग तालुका बकरे मटण खाटीक संस्था