अटल सेतूवरील टोलने एमएमआरडीए मालामाल

महिनाभरात आठ लाख वाहनांचा प्रवास; 14 कोटी रुपयांची कमाई

| उरण | वार्ताहर |

शिवडी- न्हावा शेवा अटल सागरी सेतूवरील टोलने एमएमआरडीए मालामाल झाले आहे. सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून गेल्या महिन्याभरात तब्बल 8 लाख 13 हजार 774 वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. त्यांच्याकडून जवळपास 13 कोटी 95 लाख 85 हजार रुपयांचा टोल वसूल करण्यात आला आहे.



दरम्यान, सागरी सेतूवरून सर्वाधिक 7 लाख 97 हजार कार धावल्या आहेत. मुंबईकरांची सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून एमएमआरडीएने तब्बल 17 हजार कोटी रूपये खर्चून 21 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू उभारला आहे. नवी मुंबई, पनवेल, पुणे, अलिबागहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांकडून या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सरासरी दररोज 75 हजार वाहने या मार्गावरून प्रवास करतील, असा अंदाज आहे. मात्र, गेल्या महिनाभरातील आकडेवारी पाहता दररोज सरासरी 60 हजार वाहने ये-जा करत आहेत. पहिल्याच महिन्यात मोठा प्रतिसाद मिळू लागल्याने टोलच्या माध्यमातून एमएमआरडीएला मोठा महसूल मिळाल्याचे दिसत आहे.

सेल्फी बहाद्दरांकडून 12 लाखाचा दंड वसूल
अटल सेतूवरील टोलच्या माध्यमातून एमएमआरडीएला मोठी महसूल मिळालेला असतानाच 1612 सेल्फी बहाद्दरांकडून वाहतूक पोलिसांनाही दंडाच्या माध्यमातून जवळपास 12 लाख 11 हजार रूपयांचा दंड मिळाला आहे. सागरी सेतूवर वाहने ताशी 120 किलोमीटर वेगाने चालवण्यास परवानगी आहे. त्यामुळे सेतूवर थांबून सेल्फी घेण्यास बंदी आहे. तरीही अनेक हौशी वाहनधारक सेल्फी घेतात. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 1387 तर मुंबई पोलिसांनी 225 जणांना दंडाचा दणका दिला आहे.
Exit mobile version