| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमधील वीज ग्राहकांवर महावितरण कंपनी वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणत आहे. आधीच शहरातील सतत खंडित होणारा वीज पुरवठा व तुटणाऱ्या वीज वाहिन्या या समस्यांनी ग्रस्त असलेल्या वीज ग्राहकांकडून आता आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न महावितरण करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महावितरण कंपनीकडून सुरु असलेल्या लुटी बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे.
माथेरानमध्ये वीज बिले भरणा मुदत उलटल्यानंतर दिली जात असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड समस्त माथेरानमधील ग्राहकांना बसत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग कामचुकारपणा करत असून, त्याचा भुर्दंड आम्हाला कशाला? असा प्रश्न माथेरानमधील ग्राहक विचारत आहेत. माथेरान शहरात 1400 हुन अधिक वीज ग्राहक असून त्यात मोठ्या प्रमाणात कमर्शियल वापर असलेलं वीज ग्राहक आहेत. माथेरान हे जंगलाने व्यापलेले ठिकाण असल्याने भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील वीज पूर्वतः खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर उपाय म्हणून कोणत्याही प्रकारची कार्यवाही महावितरणकडून केली जात नसल्याने चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी ठिय्या आंदोलन करून आवाज उठवला होता. त्यानंतर काही सुधारणा करण्याचे लेखी आश्वासन महावितरण कर्जत विभागाचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी लेखी स्वरूपात दिले होते. माथेरानमध्ये वीज समस्या जाटील असताना आता महावितरणकडून वीज ग्राहकांच्या खिशातून वाढीव पैसे उकळले जात असल्याने ग्राहक नाराज आहेत. वीज बिल भरण्याची मुदत संपण्याच्या तारखेला वीज बिले ग्राहकांच्या हाती पडत असल्याने वीज बिल भरण्यासाठी दहा रुपयांचा दंड माथेरान मधील ग्राहकांना भरावा लागत आहे. त्यात काही वीज ग्राहकांची थकबाकी असेल तर अशा वीज ग्राहकांना त्यांच्या बिलाच्या स्लॅबनुसार ज्यादा बिल आले तर दंड जास्त लागतो. मात्र, जे ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करतात त्या बिल ग्राहकांना नाहक भुर्दंड भरावा लागतो, असा आरोप मनसेनेचे माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी केला आहे.
महावितरणच्या अनागोंदी कारभारावर मनसे आक्रमक
