राज ठाकरेंकडून संताप
। पनवेल । प्रतिनिधी ।
पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या खच्चाखच भरलेल्या गर्दीत पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (दि.16) मनसेचा निर्धार मेळावा पार पडला. या वेळी बोलताना मनसे नेते राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर सरकारचे लक्ष वेधत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली असून, चांद्रयान चंद्रावर पाठवलंय त्याचा आपल्याला काय उपयोग. चंद्रावर जाऊन खड्डेच दाखवणार त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं तर खर्च वाचला असता, असं म्हणत रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मुबंई-गोवा महामार्गचे काम मागील 17 वर्षांपासून रखडले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने महामार्गांवर मोठ्या संख्येने अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. सरकारी अनास्थेमुळे निर्माण झालेली ही परस्थिती दूर व्हावी, तसेच मुबंई-गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था दूर व्हावी या करता मनसे आक्रमक झाली असून, गणपती पूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे. मनसेची ही मागणी पूर्ण न झाल्यास पुढे होणाऱ्या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मी आज येथे आलो असल्याचा उल्लेख या वेळी राज ठाकरे यांनी बोलताना केला. तसेच, रस्त्यांची अवस्था बिकट असताना अशा रस्त्यावर प्रवास करून देखील त्याच त्याच पक्षातील लोकांना हे लोक कसे काय निवडून देतात, असा प्रश्न उपस्थित करत यान चंद्रावर जाऊ शकत तर महाराष्ट्रातील रस्ते का बनू शकत नाहीत असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा वर टीका मध्यंतरी मनसे कडून नाशिक महामार्गावरील टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. या वर भाजपाच्या काही नेत्यांनी रस्ते बांधायला शिका आणि टोल उभरायला शिका, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत भाजपने इतर पक्षांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभारायला शिकावं. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःचा पक्ष उभारायला भाजपनं शिकावं. लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या अन् त्यांना पक्षात घ्यायचं. त्यापेक्षा स्वत:चा पक्ष उभा करा,अशी टीका राज ठाकरे यांनी भाजपा वर केली.
अजित पवार यांच्यावर टीका बाहेरून आलेली ती लोकं गाडीत झोपून जाणार आणि मग म्हणणार 'मी होतो का त्या गाडीत'. निर्लज्जपणाचा कळस सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. आपण या सरकारमध्ये का आलात तर म्हणाले महाराष्ट्राचा विकास करायचाय मला, अरे कशाला खोटं बोलताय. नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींच्या आरोप केले की टुणकन सगळे इकडे आले, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर देखील या वेळी जोरदार टीका केली आहे.
गडकरी नाही रडकरी नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या अख्त्यारीत देशात रस्त्यांचे जाळे पसरवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे गडकरींचा रोडकरी असा उल्लेख केला जातो. मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत हेच गडकरी रडकरी का होतात, अशी टीका मनसे नेते मनोज चव्हाण यांनी मेळाव्या दरम्यान केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघात होऊन मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांना मनसेच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती. या वेळी एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने मुलाच्या आठवणीने भावुक झालेल्या एका मातेने महामार्गाच्या दुरावस्थे बद्दल संताप व्यक्त करत महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी राज ठाकरेंनी प्रयत्न करण्याची मागणी केली.