मनसे जिल्हा उपाध्यक्षास खंडणीप्रकरणी अटक

| पेण | प्रतिनिधी |

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूरला पन्नास हजारांची खंडणी घेताना पेण पोलिसानी अटक केली. पेण तहसील कार्यालयाजवळ पंधरा ते वीस दिवसापूर्वी सेतू कार्यालयात मनसे उपाध्यक्ष व त्याच्या बगलबच्चांनी स्टंट करून आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत असा दिखावा केला होता. त्याचे व्हीडीओ, फोटो समाज माध्यमांवर टाकून वाहवा मिळवली होती. पण त्याच्या अडून सेतू कार्यालयाच्या मालकाजवळ 3 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर दोन लाखात त्यांची मांडवली झाली. त्याचा पहिला हप्ता 50 हजारांचा रुपये घेताना या सर्वाना रंगेहाथ पकडण्यात आले.हा प्रकार मंगळवारी रात्री घडला.

या प्रकरणातील आरोपी जनार्दन पाटील याने फिर्यादी हबीब खोत यांना पेण तहसिलदार कार्यालयाच्या आवारात भेटून संदीप ठाकूरला मोबाईल (9130704448) वर फोन करा, असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी सातच्या वा.चे सुमारास खोत यांनी मोबाईल नंबरवर कॉल केला. त्यावेळी संदीप ठाकूरने राजू पोटे मार्ग नारायण निवास येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलविले. त्याप्रमाणे फिर्यादी हे गेले असताना संदीप ठाकूर, रफीक तडवी व शालोम पेणकर यांनी मुद्रांक विक्रीच्या व्यवसायाविरूध्द तक्रार न करण्यासाठी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून फिर्यादीकडे सुरूवातीस तीन लाख रुपये व प्रत्येक महिन्यास 40 हजारांची खंडणी मागितली. न दिल्यास परवाना रद्द करण्याची व चाकूचा धाक दाखवून जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली व तडजोडीअंती 2 लाख रूपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर संदीप ठाकूर यांचे वतीने आलेल्या अनोळखी इसमाने अपना बाजार पेण नाका येथील सुपर मार्केट येथे 50,000 रूपये रोख स्वीकारले व उर्वरित दीड लाख रूपये रक्कम देण्यात सांगितले.

याबाबतची तक्रार दाखल होताच पेण पोलिसांनी सापळा रचत संदीप ठाकूर, जनार्दन पाटील, शालोम पेणकर व रफिक तडवी या सर्वांना अटक केली. तसेच, त्यांच्याविरोधात या चौघांविरुद्ध भा.द.वि.स कलम 386,506,34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या खंडणीखोरांना अटक केल्यामुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे. कारण या अगोदर देखील या महाभागाने असाच कित्येक जणांना त्रास दिलेला आहे.

चौकट खंडणीखोरांना पक्षात ठेवणार का?
बऱ्याचदा खालच्या पदाधिकाऱ्याच्यां गैरवर्तनामुळे नेत्यांना मान खाली घालावी लागते. असाच काहीसा प्रकार पेण शहरात झाला असून जिल्ह्याच्या उपाध्यक्षानेच 2 लाखाची खंडणी मागितली आणि या प्रकारात तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी देखील सामिल असल्याचे उघड झाले, अशा खंडणीखोर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे पक्षात ठेवतील का? अशी चर्चा सध्या पेण शहरात जोर धरु लागली आहे.

Exit mobile version