मनसेच्या सदस्य नोंदणीला रायगडावरुन प्रारंभ

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या सोमवार, दि. 9 मार्च रोजी वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच ते उद्या रायगड येथे जाऊन शिवरायांचा आशीर्वाद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, यंदा फक्त कार्यकर्त्यांचीच नाही, तर महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी करणाऱ्या प्रत्येकासाठी ही सदस्य नोंदणी असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यानिमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च 2026 पासून सुरु होत आहे. उद्या 9 मार्चला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच, पण शिवराज्याभिषेकाचा साक्षीदारदेखील हा किल्लाच, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.

पुढे ते म्हणाले, अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत. आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्यःपरिस्थितीबद्दल राग आहे, अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात होणार असल्याची माहितीही राज ठाकरे यांनी यावेळी दिली. सदस्य नोंदणी डिजीटल स्वरुपातही होणार आहे. ज्याचा तपशील तुम्हाला 10 मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत, उदा. मार्केट, शाळा, मंदिरं, कॉलेज, मैदानं, बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत. येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा, असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण, यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हेदेखील स्पष्ट होईल. त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version