नार्वेकरांच्या मराठी भाषेवरुन राज ठाकरेंचा घणाघात
| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गानसम्राज्ञी पद्मविभूषण आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना केलेल्या चुकीच्या उच्चारांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “समोर लिहून दिलेले मराठीही वाचता येत नसेल तर ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे,“ अशा शब्दांत त्यांनी नार्वेकरांवर निशाणा साधला. नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नव्हे, मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर केल्याचा घणाघातही राज ठाकरेंनी केला.
आशा भोसले यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या अधिवेशनात विधानसभा सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, प्रस्तावाचे वाचन करताना राहुल नार्वेकर यांनी केलेल्या उच्चारांच्या चुका आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा दीनदयाळ मंगेशकर असा चुकीचा उल्लेख यावरून राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हा प्रस्ताव स्वाहिली किंवा हिब्रू भाषेत वाचला असता तरी चालले असते, कारण त्यांचे मराठीही कुणाला समजले नाही, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी सभागृहातील आमदारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतक्या गंभीर प्रसंगी एकाही आमदाराने आक्षेप घेतला नाही, हे अधिक धक्कादायक आहे, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली जात आहे, याचे गांभीर्य सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवे होते, अशी टीका त्यांनी केली.
मराठी भाषेची होत असलेली उपेक्षा आणि सभागृहातील निष्काळजीपणावरून राज ठाकरे यांनी सरकारवरही हल्लाबोल करत, ज्याला समोरचे मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेचे संरक्षण कसे करणार? असा सवाल उपस्थित केला.
एकनाथ शिंदेंचं विमान 50 हजार फुटांवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पन्नास हजार फुटांवरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली.






