विमानतळ नामकरणावर भारती पोवार यांचा सरकारवर घणाघात
| चिरनेर | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव अद्याप न देणे ही शेतकरी, भूमीपुत्र आणि हुतात्म्यांशी केलेली प्रतारणा असल्याचा घणाघात 1984 च्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनातील रणरागिणी भारती पोवार यांनी केला. जसखार येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
1984 च्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देताना भारती पोवार म्हणाल्या, दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी जमिनीच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते. सरकारच्या दडपशाहीला न जुमानता हा संघर्ष उभा राहिला. आज त्या लढ्याच्या स्मृती जपणाऱ्या दि.बांचे नाव विमानतळाला न देणे हा अन्याय आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या विकास प्रकल्पांवर त्यांचा इतिहास आणि योगदानाचा सन्मान झाला पाहिजे. दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देणे ही जनतेची भावना असून, सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सभेत दि.बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नावासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.







