भारत गॅस एजन्सीसमोरील गैरसोयीवर संताप
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा शहरासह परिसरातील गावांमधून भारत गॅस एजन्सीच्या सेवेसाठी येणाऱ्या ग्राहकांना पावसाळ्यात मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. एजन्सी परिसरात चिखल, अस्वच्छता आणि निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने ग्राहकांची अक्षरशः परवड होत असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गॅस सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखलातून वाट काढत रांगेत उभे राहावे लागत आहे. बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
गॅस ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सेवा असताना ग्राहकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांसाठी स्वच्छ परिसर, चिखलमुक्त मार्ग, बसण्याची व्यवस्था आणि पावसापासून संरक्षणासाठी निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, तालुका पुरवठा अधिकारी हेमलता कुरसुगे यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित एजन्सीला ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. परिसराची स्वच्छता राखणे, निवारा शेड उभारणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत एजन्सीला निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या वाढत्या नाराजीमुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
विठ्ठल मोरे,
गॅस ही प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी निगडित अत्यावश्यक सेवा आहे. अशा सेवेकरिता ग्राहकांना चिखल, अस्वच्छता आणि पावसात रांगेत उभे राहावे लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय गंभीर बाब आहे. संबंधित एजन्सीने तातडीने निवारा शेड, स्वच्छ परिसर आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा याबाबत पुढील पाठपुरावा करण्यात येईल.
शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य







