वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा रास्ता रोकोचा इशारा

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील खोपटा कोप्रोली, गव्हान फाटा, चिर्ले आणि दिघोडे या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्री अपरात्री होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नवीमुंबई परिसरात जाणार्‍या रुग्णांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवार 11 जुलै 2024 रोजी खोपटा कोप्रोली रस्त्यावर ‘रास्ता रोको’ तसेच दिघोडे येथे शुक्रवारी 12 जुलै 2024 रोजी रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे तसेच नवीमुंबई पोलीस आयुक्त, कस्टम विभाग यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती मनसेचे उरण तालुका अध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी दिली आहे.

उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे. परंतु उरण पुर्व विभागातील रहिवाशांच्या रहदारीच्या खोपटा, कोप्रोली, गव्हाण फाटा, चिर्ले वेश्‍वी आणि दिघोडे रस्त्यावर रात्री अपरात्री बेधडकपणे अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. त्याचा त्रास हा सातत्याने सर्व सामान्य नागरिकांसह रुग्णांना, शालेय विद्यार्थी, प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यार्ड गोदामात पार्किंगची व्यवस्था नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त कंटेनरची हाताळणी हे व्यावसायिक करत असल्याने सदर रस्त्यावर व गोदामात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. या सर्व जनतेच्या निगडीत समस्यांसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याने, मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 11 ते 12 जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा मनसेच्यावतीने मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी दिला आहे.

Exit mobile version