वीजपुरवठ्याच्या समस्येवर मनसे आक्रमक

संतोष कदम यांचा उपोषणाचा इशारा

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये सुरू असलेल्या उन्हाळी पर्यटन हंगामादरम्यान वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम यांनी महावितरणला उपोषणाचा इशारा दिला आहे.

महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे माथेरानमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक उद्योग-व्यवसाय आणि पर्यटन व्यवसायावर होत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. पर्यटन हंगामात वीज खंडित झाल्यानंतर संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. माथेरानकर नियमितपणे वीजबिले भरत असतानाही त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, परिस्थितीत तातडीने सुधारणा न झाल्यास 10 जूनपासून उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा संतोष कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन महावितरण प्रशासनासह माथेरान नगरपरिषद, माथेरान पोलीस ठाणे आणि माथेरानचे अधीक्षक यांनाही देण्यात आले आहे.

Exit mobile version