मनसेचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात गेली सात महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना फोल ठरत आहेत. दरम्यान, आगामी एप्रिल महिन्यापासून माथेरानमध्ये पर्यटन हंगामा सुरू होणार आहे आणि त्याआधी माथेरान शहरातील विजेचा लपंडाव थांबला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात वादळानंतर माथेरानमधील वीज पुरवठा तब्बल चार दिवस खंडित होता. महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नेरळ माथेरान घाट रस्त्यातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केले. अनेक ठिकाणी नव्याने विजेचे खांब उभे करण्यात आले. मात्र, सात महिन्यानंतर देखील महावितरणकडून माथेरान शहरात सुरळीत वीज पुरवठा देऊ शकली नाही. त्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कायम असून महावितरणकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन माथेरान शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने महावितरण कंपनीला इशारा देण्यात आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीचे उप अभियंता केंद्र यांची कर्जत येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.