। उरण । वार्ताहर ।
उरणच्या हवेतील प्रदुषणात सध्या सुधारणा होत आहेत. असे असताना गोदाम व्यवसायिक आणि भंगार व्यवसायिकांकडून पुन्हा उरणची हवा प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे व्यावायीक टाकावू साहित्यांना आग लाऊन ते नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या आगीत धुराचे लोट उसळून हवेचे प्रदुषण होत आहे. तरी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्यासह प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी अशा गोदाम व भंगार व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नसल्याने केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्प तसेच खासगी गोदाम, भंगार व्यवसायिक उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रदुषण पसरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे जागतिक व देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे. वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रता याचा येथील नागरिकांच्या शरीरावर अतिशय हानिकारक परिणाम होऊ लागला असून उरण तालुक्यात कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच दमा, खोकला,अँटेक सारख्या इतर आजाराचे प्रमाण ही वाढत चालले आहे.