मावळमध्ये मनसे नाराज

प्रचार साहित्य, बॅनवरुन राज ठाकरेंचा फोटो गायब

| नेरळ | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने मनसैनिकांमध्ये कमालीची नाराजी असून, मनसेची मते महायुतीला नको आहेत काय, असा खडा सवाल पक्षाच्या वतीने विचारला जात आहे. दरम्यान, मनसेचे नेते तसेच कार्यकर्ते आणि खासदार बारणे यांची नियोजित बैठक न झाल्याने सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारापासून लांब आहेत.

नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा महायुतीला देण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर महायुतीच्या बहुसंख्य उमेदवारांच्या प्रचार साहित्यावर राज ठाकरे यांचे फोटो झळकू लागले. त्याचवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या सर्व 48 लोकसभा उमेदवार यांच्या मतदारसंघात समन्वयक नेमले. त्यानुसार मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि खोपकर हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला खोपोली येथे आले. तेथे मनसेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांचे पदाधिकारी उपस्थित होते. 18 एप्रिल रोजी मनसे पदाधिकारी आणि समन्वयक यांच्यासोबत बैठक झाल्यावर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते नाराज झाले असून, आमच्या नेत्यांना बोलावून खासदार स्वतः उपस्थित न राहता आपल्या मुलाला पाठवतात, ही गोष्ट बरोबर नाही, अशी टिप्पणी मनसेचे पदाधिकारी करीत होते.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे निवडणुकीचे बॅनर काल आणि आज मतदारसंघात सर्वत्र झळकले आहेत. त्या बॅनरवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला नाही. त्यामुळे मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना समाज माध्यमांवर जाब विचारला आहे.

याबाबत रायगड जिल्हा अध्यक्ष पाटील यांच्याकडून संबंधित प्रकरणी महायुतीच्या वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी घालण्यात याव्यात अशी सूचना पक्षाच्या नेत्यांना केली आहे. त्यामुळे वेळेत चूक सुधारा नाही तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांना पण वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा मनसेच्या वतीने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिला आहे.

Exit mobile version