मनसे आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवणार नाही – राज ठाकरे

| नेरळ | वार्ताहार |

सत्तेसाठी राजकारण्यांनी आपली मनं आणि स्वाभिमान गहाण ठेवला आहे. महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना आपला स्वाभिमान आणि महाराष्ट्र कधीच गहाण ठेवू देणार नाही, इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. कर्जत तालुक्यातील नेरळ-धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्ट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेची सहकार परिषद आणि दोन दिवसीय सहकार शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचे उदघाटन केल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विना सहकार नाही उध्दार अशी सहकारात म्हण आहे. परंतु, सध्याचे राजकारणी हे सत्तेसाठी सहकारी बनले आहेत, असा घणाघाती टोला ठाकरे यांनी लगावला.
रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांंच्या जमीनी बळकावण्यासाठी समुद्रमार्गे अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जमिनी वाचविण्यासाठी एक व्हा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

मराठी माणसे उद्योग व्यवसाय करू शकत नाही अशी आवई उठविली जाते. हजारो मराठी माणसे उद्योग व्यवसाय करतात. मात्र, ते प्रसिद्धीपासून लांब असतात. या ठिकाणी मनसेने दोन दिवसांचे शिबीर भरवले आहे. त्या रेसॉर्टचे मालक मराठी आहेत हे ऐकून समाधान वाटले असे सांगून मराठी व्यावसायिक आणि उद्योजकांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सहकारामध्ये सर्वांना एकत्र घेण्याची चळवळ काय असते हे महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षात दिसत आहे. सहकार चळवळ नाही, तर आम्ही अडकलो आहोत म्हणून आम्हाला सहारा देण्यासाठीती ही चळवळ आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

ठाणे जिल्ह्यावर धनिकांनी कब्जा मिळविला आहे. आता रायगड जिल्हा त्यांच्या केंद्रस्थानी असून जमीनी सावकारांच्या घशात जाऊ नये त्यासाठी आंदोलन केले ते महात्मा फुले यांनी केले. त्यांच्यामुळे सहकार चळवळ सुरू झाली आणि टिकली. त्याच महाराष्ट्र्रात जमीनी काबीज करण्याचे कारस्थान पैशेवाल्यांनी सुरु केले आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. विकासाच्या नावाखाली सुमुद्रात पूल बांधले जात आहेत आणि त्याचमार्गे म्हणजे समुद्रमार्गे आपली लूट करण्यासाठी ते येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा सतर्क राहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. साखर कारखाने उभारून मराठवाड्यातील सुपीकता ओरबडली जात असल्याचा आरोप करून साखरेच्या उत्पादनासाठी ऊस लावावा लागतो आणि त्या उसाच्या शेतीसाठी सर्वाधिक पाणी लागते. कारखाने उभारून जमिनीतील पाणी खेचून पाण्याची लूट मराठवाड्यात सुरु असून येत्या 40- 45 वर्षात मराठवाड्यातील जमीनीमधील पाणी संपून जाईल आणि त्यानंतर मराठवाड्यात वाळवंट होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधेले.

याप्रसंगी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, पक्षाचे नेते शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, पक्षाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, किसान सेलचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते संतोष नागरगोजे, मनसे रेल्वे युनितचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version