आगामी निवडणुकीत मनसे दाखवणार ताकद

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
आगामी काळात लांजा तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पक्ष बांधणीवर आम्ही जोर दिला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद या निवडणुकीत दाखवून देवूच, असे प्रतिपादन मनसेचे लांजा तालुका सहसंपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांनी केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, तालुक्यात युवकांची मजबूत फळी तयार करून त्याद्वारे मनसे पक्ष संघटना बांधणीवर जोर देऊन पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करून देणार आहोत.
तसेच, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर तालुक्यात पक्षाची व्यवस्थित घडी बसली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात पक्ष संघटनेला तालुका पातळीवर योग्य असे नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे पक्ष संघटनेवर मरगळ आली होती. आपण तालुक्याचे सुपुत्र या नात्याने पुन्हा एकदा लांजा तालुक्यात मनसे पक्ष संघटना बांधणीवर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गत महिन्यात पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या पश्‍चिम भागातील चिरेखाणीवर काम करणार्‍या तरुणांचा कामाचा प्रश्‍न मार्गी लावला होता. तशाच प्रकारचे प्रश्‍न आगामी काळात मार्गी लावून पुन्हा एकदा लांजा तालुक्यात मनसे पक्षाला गतवैभव मिळवून देणार असल्याचे पाथरे यांनी सांगितले.

Exit mobile version