नागपुरात मनसेचा राडा

टोलवसुलीविरोधात टोलनाका फोडला

| नागपूर | प्रतिनिधी |

टोलवसुलीविरोधात मनसे कायर्र्कर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी टोलनाक्यावर तोडफोड केली आहे. नागपुरातील वाडी ते हिंगण्याकडे जाणार्‍या मार्गावारील टोलवसुलीविरोधात मनसेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकार्‍यांनी ही तोडफोड केली.

मनसेच्या पदाधिकार्‍यांनी धिंगाणा घालत टोलवसुली विरोधात आंदोलन केले होते. सोमवारी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी टोलनाक्यावर जाऊन काचांची तोडफोड केली. शहराच्या तीस किलोमीटरच्या परिसरात टोलनाका नको, असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात आहे. सोयी सुविधा मिळत नसताना टोलवसुली केली जातेय, असा आरोप मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केला. आता तोडफोड केल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी पाच मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये तीन टोलनाके आहेत. या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, मालवाहतूक करणार्‍या वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने सोमवारी येथील टोलनाक्यावर जाऊन खळ्खट्याक स्टाईलने आंदोलन केले. टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली.

Exit mobile version