| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.19) मनसेतर्फे नेरळ व कर्जत शहरात भिकमागो आंदोलन करण्यात आले. सकाळी नेरळ येथील साई मंदिर चौकात आणि दुपारी कर्जत येथील टिळक चौकात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांनी ‘रस्ते खड्डेमुक्त करा’, ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या भाकरीवर भाष्य करत खिशातील पैसे काढून मनसेच्या भिकमागो आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच स्थानिक संघटनांचा पाठिंबा मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यांतून मोर्चा काढला आणि प्रशासनाचे डोळे उघडले. आंदोलनादरम्यान मनसेने जमवलेली 1 हजार 240 रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत ऑनलाईन जमा करणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याद्वारे जनतेकडून भिक मागूनही आम्ही खड्डे बुजवू, पण तुमचा भ्रष्टाचार सोडणार नाही, असा प्रशासनाला तीव्र संदेश दिला आहे.
भ्रष्टाचाराविरोधात मनसेचा हल्लाबोल
