पनवेल एसटी स्टँडवर मनसेचा दणका

| पनवेल | प्रतिनिधी ।

महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल एसटी बस स्थानक हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या स्थानकावरील शौचालयाच्या व्यवस्थापनाबाबत प्रवाशांकडून, विशेषतः महिला प्रवाशांकडून अनेक गंभीर तक्रारी प्राप्त होत होत्या. मुंबईकडे जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस असंख्य प्रवासी या स्थानकावर येत असतात. अशा वेळी, विशेषतः रात्री 11 वाजल्यानंतर, तेथील शौचालय बंद केले जात होते आणि हक्काच्या सुविधेसाठी विचारणा करणाऱ्या महिला प्रवाशांशी तिथे कार्यरत असलेले कर्मचारी अत्यंत उद्धट व अरेरावीचे वर्तन करत होते. हा सर्व त्रास सहन न झाल्याने प्रवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली होती.

तक्रारींचा ओघ वाढताच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट पनवेल एसटी स्टँडवर धडक दिली. प्रवाशांकडून रीतसर पैसे घेतले जात असताना रात्रीच्या वेळी शौचालय बंद का ठेवले जाते, असा जाज्वल्य प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. यावेळी तिथे पोलीस कर्मचारीही मध्यस्थीसाठी हजर होते. मनसे कार्यकर्त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना व कंत्राटदाराला ‘मनसे स्टाईल’ने कडक शब्दांत समज दिली की, यापुढे प्रवाशांची, विशेषतः महिलांची कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, आता हे शौचालय प्रवाशांसाठी 24 तास खुले करण्यात आले आहे. मनसेच्या या धडक कामगिरीमुळे रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version