किल्ला येथील मोबाईल कायदेविषयक शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

| नागोठणे । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या नियोजित कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. 7) दुपारी 3 वाजता किल्ला ग्रामपंचायती अंतर्गत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोबाईल कायदेविषयक माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मोबाईल कायदेविषयक माहिती शिबिरास रोहा न्यायालयातील विधिज्ञ अ‍ॅड. मिरा पाटील, अ‍ॅड.दिनेश वर्मा, अ‍ॅड.एस.ए.हाफिज, अ‍ॅड.दिव्या सावंत, अ‍ॅड.वैभवी शिंदे, किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश बामुगडे, ग्रामसेविका रोशनी मोरे, रोहा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक पी.आर.पाटील, कनिष्ठ लिपिक शैलेश यादव, योगेश सोनोने, शिपाई सागर पाष्टे आदींसह ग्रामस्थ व महिला यावेळी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

या शिबिरात सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महिलांचे अधिकार, मोटार वाहन कायदा व तालुका विधी सेवा समितीचे कार्य यावर कायदेविषयक मार्गदर्शन केले.

अ‍ॅड. मिरा पाटील यांनी ए.डी.आर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 मध्ये विधी सेवा समिती मार्फत पुरविण्यात येणार्‍या कायदेविषयक सेवा या विषयावर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. दिव्या सावंत यांनी वाहतूक नियमांविषयी कायदे यासंदर्भात माहिती दिली. यावेळी अ‍ॅड. एस.ए.हाफिज यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version