कॅशलेस व्यवहार ठप्प; व्यावसायिकांसह पर्यटकांची गैरसोय
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र तसेच भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायिकांसह पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे नामांकित तीन कंपन्यांनी भ्रमणध्वनी सेवा सुरु केल्याने नागरिकांसह व्यावसायिकांनी ही भ्रमणध्वनी सेवेचा लाभ घेतला. इंटरनेट माध्यमातून आलेल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करणे सोपे जावे, या दृष्टीने व्यावसायिकांनी डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध केली. सद्यस्थितीत हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी सेवा वारंवार ठप्प होत असल्याने कॅशलेस व्यवहार ठप्प होत आहेत. यामुळे व्यावसायिकांसह पर्यटकांची गैरसोय होताना दिसते.
हरिहरेश्वर तिर्थक्षेत्रावरील प्रदक्षिणा मार्गावर पर्यटक सेल्फीचा मोहात आपला जीव गमावतात. यावेळी या परिसरात स्थानिक नागरिक घटनास्थळी असल्यास वेळीच बचावकार्य सुरू होते. परंतु, अशा घटनांवेळी भ्रमणध्वनी सेवा अखंडित असणे आवश्यक आहे. जेणेकरून, घटनास्थळी अधिक मदत भासल्यास पर्यटक मुक्कामाला आलेल्या ठिकाणी संपर्क करू शकतील.
बँक, शासकीय कार्यालये तसेच ऑनलाइन नोकरी व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नो कनेक्टिव्हिटीमुळे नुकसान होत आहे. जनगणनेचे काम भ्रमणध्वनी ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने होत आहे. ही प्रक्रिया १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडत आहे. याकरीता हरिहरेश्वर येथील भ्रमणध्वनी सेवा अखंडित असावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कंपनीमार्फत खुलासा
एकाच वेळी एकाच टॉवरवरून अनेक भ्रमणध्वनी ग्राहक हे इंटरनेट किंवा कॉल करत असल्यास नेटवर्क जाम होते. यामुळे कॉल ड्रॉप होणे किंवा इंटरनेट बंद पडणे असे प्रकार घडतात. भ्रमणध्वनी टॉवरना सिग्नल प्रसारित करण्यासाठी सतत वीजपुरवठा आवश्यक असतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण उद्भवू शकते. अशा कारणांमुळे संबंधित क्षेत्रातील भ्रमणध्वनी सेवा खंडित होऊ शकते, असा खुलासा कंपनी प्रतिनिधीने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी सेवा बंद पडत असल्याने आम्हा व्यावसायिकांना फटका बसतो. पर्यटक खरेदी करून झाल्यावर डिजिटल पेमेंटसाठी आग्रही असतात. नेटवर्क नसल्यास त्याची अडचण होते व अनेकवेळा वादविवाद होतात. येथील तिन्ही भ्रमणध्वनी कंपन्यांनी आपल्या सेवेत सुधारणा करावी. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
– सचिन गुरव, व्यावसायिक, हरिहरेश्वर
