| कोर्लई | वार्ताहर |
संगणकीय युगात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला असून, महत्त्वाच्या कामासाठी त्याचा वापर करावा, असे प्रतिपादन वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण संघटन (नागपूर) विभागीय समावेशक ॲड. के.डी. पाटील यांनी केले. नागरी संरक्षण दलातर्फे मुरुड दस्तुरी नाका येथील अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेत आयोजित कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
नागरी संरक्षण दलातर्फे मजगाव व मुरुडमधील शासकीय व अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेच्या आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थींनी तसेच इच्छुक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन प्रथम अभ्यासक्रमातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा मनोमन आनंद होत असून, आज प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी शिस्तीचे पालन करावे आणि कोणतेही काम करत असताना मन आनंदी ठेवावे, असेही पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी ॲड. विवेक पाटील, महेश पाटील, रमेश पाटील, महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी, अव्वल कारकून विजय मापुस्कर, संतोष भगत, नागरी संरक्षण दल इनचार्ज तुफैल दामाद,अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेचे चेअरमन समीर दवनाक, आय.टी.आय. प्राचार्य इस्तियाक घलटे, उपप्राचार्य शाहीद कलाब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 84 प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षण दलातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. यात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीद कलाब यांनी केले. सूत्रसंचालन सरफराज घोले यांनी, तर प्रा. इस्तियाक घलटे यांनी आभार मानले.