| पनवेल | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील ओरायन मॉलमध्ये ‘मॅड ओव्हर मोदक’ या विशेष मोदक बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या पाककौशल्यासोबतच सर्जनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले. विविध आकार, रंग, सजावट आणि चवींच्या मोदकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत पारंपरिक उकडीच्या मोदकांपासून ते आकर्षक पद्धतीने सजवलेल्या नाविन्यपूर्ण मोदकांपर्यंत विविध प्रकार पाहायला मिळाले. प्रत्येक स्पर्धकाने मोदकाची चव, आकारमान, सजावट आणि सादरीकरण यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी जणू मोदकांच्या रूपात कल्पकतेचीच मेजवानी पाहायला मिळाली. या स्पर्धेत वैष्णवी कोचरेकर यांनी प्रथम क्रमांक, शर्वरी सुतार यांनी द्वितीय क्रमांक, तर अंकिता देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच गणेशोत्सवातील पारंपरिक खाद्यसंस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री धनश्री कडगावकर यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. त्यांनी स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या पाककौशल्याचे कौतुक केले. नागरिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
मोदकांनी जिंकली रसिकांची मने
