। पनवेल । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या मुलांना चांगले आणि स्वच्छ अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे; तसेच, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शाश्वत शिक्षण वातावरण प्रदान करून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने पनवेल येथील शेलघर (उलवे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आयजी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने एनोबल सोशल इनोव्हेशन्सच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या नूतनीकरणात स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याचे पाण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दिवसभर स्वच्छ आणि निरोगी पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यावरील मुलामुलींसाठी स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शाळेच्या प्रत्येक पैलूचे नुतनीकरण करण्यात आले आहे. शाळेतील 11 वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा, कार्यालय आणि कॉरिडॉरची पुनर्बांधणी प्लास्टरचे काम, भेगा दुरुस्त करून आणि रंगकाम करण्यात आले आहे. वर्गांमध्ये नवीन पंखे, दिवे आणि स्विच बोर्ड बसवून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडता यावे यासाठी संगणक प्रयोगशाळा पुनर्संचयित करण्यात आली. यावेळी आयजीपीएलचे कार्यकारी संचालक सागर जाधव, डॉ. व्ही.पी. राजकुमार, माजी आमदार बाळाराम पाटील, वसंत पाटील, सीताराम मोहिते, गटशिक्षणाधिकारी निंबाजी गीते, समीर पळसुले, राहुल जयस्वाल, एनोबलचे प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते.