। उत्तरप्रदेश । वृत्तसंस्था ।
इलेक्टोरल बाँड योजना ही जगातील सर्वात मोठी ‘खंडणी योजना’ आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘भ्रष्टाचाराचे चॅम्पियन’ आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या बाजूने जोरदार अंडरकरंट आहे. यावेळी भाजप फक्त 150 जागांपर्यंतच मजल मारू शकेल. आता रद्द करण्यात आलेल्या इलेक्टोरल बाँडवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांचा दावा आहे की ही योजना निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणली गेली होती, मग सर्वोच्च न्यायालयाने ती का रद्द केली? इलेक्टोरल बाँड योजना ही जगातील सर्वात मोठी खंडणी योजना आहे. भारतातील उद्योगपतींना हे चांगलेच माहीत आहे. पंतप्रधानांनी कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण पंतप्रधान हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असे गांधी म्हणाले.
जर तुम्हाला पारदर्शकता आणायची होती, तर भाजपला हजारो कोटी रुपयांची देणगी देणार्यांची नावे का लपवली गेली? ज्या कंपन्यांनी भाजपला देणग्या दिल्या त्याच्या तारखा का लपवल्या गेल्या, असा सवाल राहुल यांनी यावेळी केला. एका कंपनीला हजारो कोटींचे कंत्राट मिळाल्याचे आढळून आले आणि काही दिवसांनी त्या कंपनीने भाजपला देणगी दिली. एका फर्मची सीबीआय किंवा ईडी चौकशी झाली आणि 10-15 दिवसांनी, त्या फर्मने भाजपला देणगी दिली आणि ती चौकशी संपली, अशा घटना समोर आल्याचा आरोप राहुल यांनी केला.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून गाझीपूरपर्यंत परिवर्तनाचे वारे वाहू लागतील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला भव्य निरोप दिला जाईल, असे अखिलेश यादव यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत एकही मत विभागले जाणार नाही याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल, असेही अखिलेश यांनी नमूद केले.