कॉर्पोरेटच्या मर्जीवर चालणारे मोदी सरकार


सुखदेवसिंग सिरसा यांची जहरी टीका
। नाशिक । वृत्तसंस्था ।
देशाचे सध्याचे सरकार मतदारांच्या मतावर नव्हे तर कॉर्पोरेटच्या मर्जीवर चालणारे आहे, अशी जहरी टीका दिल्ली आंदोलनातील नेते सुखदेवसिंग सिरसा यांनी केली आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
शेतकरी आंदोलनातील सक्रिय ज्येष्ठ नेते व पंजाब साहित्यिक अकादमीचे अध्यक्ष असलेले सुखदेवसिंग सिरसा यांनी सांगितले, की देशात 26 कोटींपेक्षा जास्त नागरिक शेती व्यवसायावर आधारित आहेत. त्यातील 11 कोटी नागरिकांकडे शेती आहे, तर उर्वरित 14 कोटींपेक्षा जास्त नागरिकांकडे शेती नाही पण त्यांचा उदरनिर्वाह हा शेतात काम करून चालतो. नेमके केंद्र सरकारने यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला या आंदोलनाला साम-दंड-भेद आदी कूटनीतीचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न झाला, पण देशभरातील शेतकरी मात्र कधी एकजूट झाले हे शासनात बसलेल्या मोदी व त्यांच्या टीमलाही कळले नाही.
सुरवातीला पंजाब, हरियानाचे शेतकर्‍यांचेच आंदोलन आहे, असा खोटा प्रचार केला गेला. पण देशातील सर्वच राज्यांतील शेतकरी, शेतमजूर तसेच शेतीवर आधारित व्यावसायिक, समाजातील माजी न्यायमूर्ती, वकील, डॉक्टर, कामगार, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, विद्यार्थी आदी क्षेत्रांतील व देश-विदेशातील भारतीय नागरिक सहभागी झाले होते. यामुळे हा लढा जिंकता आल्याचे प्रतिपादन सिरसा यांनी केले
शेतकर्‍यांनी इंग्रजांपासून शेतीच्या प्रश्‍नावर व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठा लढा उभारल्याचाही इतिहास आहे, हे प्रखर राष्ट्रवादीच्या वल्गना करणार्‍यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही सिरसा यांनी दिला. राकेश वानखेडे, सुभाष लांडे व काजल बोरसे यांनी मुलाखत घेतली.

Exit mobile version