मोदी सरकार हे जनतेची लूट करणारे सरकार

दीपक राऊत यांचा आरोप
। चिपळूण । प्रतिनिधी ।
मोदी सरकार हे सर्वसामान्यांची लूट करणारे सरकार असल्याचा घणाघात काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत यांनी केला आहे. तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील गणेश मंदिरात काँग्रेसच्या जनजागरण अभियानानिमित्त सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
दीपक राऊत म्हणाले की, केंद्र सरकारकडून केवळ अन्याय आणि अत्याचार सुरू आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचे काम सुरू आहे, याची जाणीव करून देण्यासाठी जनजागरण अभियान आहे. आजचे सरकार सर्वसामान्यांपेक्षा उद्योगपतींच्या हिताचा विचार अधिक करत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा परत आलाच नाही, उलट देशाची अर्थव्यवस्था कोसळली, गरीबांचे अधिक हाल झाले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेची लूट करणार्‍या या सरकारच्या विरोधा काँग्रेसने लढा पुकारला आहे. तुम्ही सारे या लढ्यात एकजुटीने सहभागी व्हा आणि या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहनही राऊत यांनी केले.
तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी, काँग्रेस हा केवळ पक्ष नव्हे, तर एक विचारधारा आहे. जुनी मंडळी आजही काँग्रेसवर प्रेम करत असल्याचे प्रतिपादन केले आहे.
याशिवाय, काँग्रेसच्या काळातच ग्रामीण भागाचा, शहराचा पर्यायाने देशाचा विकास झाला, हे कोणीही नाकारू शकत नसल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेस आता बदलत आहे. तरुणांना संधी आणि जुन्या काँग्रेसप्रेमींचा सन्मान, महिलांना सन्मानाची वागणूक हे केवळ काँग्रेसमध्ये मिळू शकते. काँग्रेसपासून दुरावलेल्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी आम्ही जनजागरण अभियानाच्या माध्यमातून गावोगावी, वाडी-वाडीवर पोहचत आहोत. तरुणांनी आता भूलथापांना बळी न पडता सत्याची कास धरावी, असे आवानही प्रशांत यादव यांनी केले आहे.
या कार्यक्रमात ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांची ओबीसी सेलच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू थरवळ, चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, प्रकाश साळवी, काँग्रेसचे प्रवक्ते वासुदेव सुतार, दीपक निवाते, मनोज शिंदे, अन्वर जबले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, ह.भ.प. बाबाजी भुवड, राजाभाऊ चव्हाण, विष्णू बैकर, अनंत भडकमकर, अजय जाधव, कृष्णकांत भुवड, गुलामभाई चिपळूणकर आदी -पदाधिकारी तथा मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version