खोट्या आश्‍वासनांसाठीच मोदी, केजरीवाल

राहूल गांधी यांचा घणाघात
। चंढीगड । वृत्तसंस्था ।

खोट्या आश्‍वासनांसाठीच मोदी आणि केजरीवाल यांचे नाव आता जगजाहीर झाले असून, यांच्या आश्‍वासनाला पंजाबच्या जनतेने भूलू नये. नाहीतर विकास होवो न होवो, विश्‍वासघात नक्कीच होईल, असा घणाघात अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रचार मैदानात उतरलेले राहुल गांधी यांनी पटियालामध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधला.
ते म्हणाले की, माझ्याबद्दल दोन गोष्टी समजून घ्या, जेव्हा मी बोलतो तेव्हा विचारपूर्वकच बोलतो मग तुम्हाला आवडो अथवा न आवडो मी या व्यासपीठावरून खोटी आश्‍वासनं देणार नाही. पंजाबाला धोक्यापासून दूर ठेवायचे असेल तर सगळ्यांनी एकजुटीने चालायला हवे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत असून, तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी आंदोलनमुळे पंजाबचा बहुतांश मतदार भाजपपासून दुरावल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर आम आदमी पक्ष देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पंजाबच्या विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दरम्यान, देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक झटका बसतोय. आता काँग्रेसचे बडे नेते आणि माजी कायदा मंत्री अश्‍विनी कुमार यांनी पक्षाला रामराम केला आहे. गेल्या 46 वर्षांपासून ते काँग्रेसचे सदस्य होते. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याची सध्या चर्चा आहे. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
अश्‍निनी कुमार हे पंजाबमधून काँग्रेसचे राज्यसभा सदस्य होते. दरम्यान, 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा राजीनामा देणं काँग्रेससाठी मोठा झटका असू शकतो. हा यासाठी देखील आश्‍चर्याचा धक्का आहे की अश्‍विनी कुमार हे सोनिया गांधी यांचे विश्‍वासू मानले जात होते. ॠ23 नेत्याच्या काळातही त्यांनी सोनिया गांधींच्या बाजूनं भूमिका घेतली होती.

सत्यच बोलणार
मी खोटी आश्‍वासने देणार नाही. जर कोणाला खोटी आश्‍वासने ऐकायची असतील तर त्यांनी पंतप्रधान मोदी, सुखबीर सिंग बादल आणि अरविंद केजरीवाल यांची भाषणे ऐकली पाहिजेत. मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे. असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version