‘मोदी की गॅरंटी’ हा खोटारडेपणा

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका

| हिंगोली | वृत्तसंस्था |

नरेंद्र मोदी हे बोलताना प्रत्येकवेळी ‘मोदी की गॅरंटी’ या शब्दाचा वापर करीत आहेत. त्यावर विश्‍वास कसा ठेवायचा? त्यांची गॅरंटी हा खोटारडेपणा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.

हिंगोली मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार डॉ. बी.डी. चव्हाण यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. ‘ईडी’, ‘सीबीआय’ व इतर तपास यंत्रणा वसुलीसाठी वापरल्या जात आहेत. यातून 16 हजार कोटींची वसुली झाली आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन करतात. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी कायदा करावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेपासून रोखले पाहिजे,’ असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

संघाची गरज संपली?
परभणी : ‘सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटण्यासाठीही पंतप्रधानांकडे वेळ नाही. आता संघाची गरज संपल्यासारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी वागत आहेत,’ अशी टीका अ‍ॅड. आंबेडकर यांनी येथे केली. परभणी मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार पंजाब डक यांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांनी काँग्रेसने फसविले. काँग्रेसने ‘वंचित’बरोबर काम करावे म्हणजे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत त्यांचा एखादा साथीदार तरी शिल्लक राहील, असा टोला त्यांनी लगावला.
Exit mobile version