| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नरेंद्र मोदींनी विशेष समुदाय किंवा विरोधकांवर टार्गेट करण्यासाठी द्वेषपूर्ण आणि असंसदीय भाषण देऊन पंतप्रधानपदाची पत आणि प्रतिष्ठा घालवली आहे, असा हल्लाबोल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदींवर निशाणा साधत केला. लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा उरला आहे. शेवटच्या टप्प्यात (दि.1) जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वीच मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या नागरिकांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. त्यातून मोदींवर हल्ला चढवून त्यांच्या दहा वर्षांच्या कामगिरीचा पंचनामाही केला आहे.
देशात काँग्रेसच केवळ विकास आणि प्रगतीशील भविष्य देऊ शकते. काँग्रेस सत्तेत आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण होणार आहे. देशात अमानवीकरणाचा प्रकार परमोच्च बिंदूवर गेला आहे. त्यामुळेच आता आपल्याला या शक्तींपासून आपला देश वाचवायचा आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली. देशभक्ती, शौर्य आणि सेवेचं मूल्य केवळ चार वर्षाचं आहे, असं भाजपला वाटत आहे. यातून भाजपचा नकली राष्ट्रवाद दिसून येत आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अग्निवीर योजनेवरून भाजपला धारेवर धरलं होतं.
हीच शेवटची संधी डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, माझ्या प्रिय नागरिकांनो, सध्या भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. मतदानाच्या या अंतिम टप्प्यात निरंकुश राजवटीचा अंत करुन आपल्या लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण करण्याची ही शेवटची संधी आहे. पंजाब आणि पंजाबी हे योद्धे आहेत. आपण आपल्या त्यागाच्या भावनेसाठी ओळखले जातो. लोकशाही व्यवस्थेवरील आपला एकोपा, सौहार्द आणि जन्मजात विश्वास आपल्या महान राष्ट्राचे रक्षण करू शकतो.
सरकारचे धोरण चुकीचे मनमोहन सिंग यांनीही पत्रात मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी लिहिले की, गेल्या 10 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत अकल्पनीय उलथापालथ झाली. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, कोरोना लॉकडाऊनचा निर्णय, यामुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी वाढीचा दर 6 टक्क्यांहून कमी राहिला आहे, तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात तो 8 टक्क्यांच्या आसपास होता, असेही ते म्हणाले.