मोदी क्रीडांगणाला छावणीचे स्वरूप

भारत-पाक सामन्यासाठी कडक सुरक्षा; 7000 सैनिक, बॉम्ब डिस्पोजल टीम

| अहमदाबाद| वृत्तसंस्था |

भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक 2023 रोमांचक सामन्यांसह पुढे जात आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रीडांगणावर होणार आहे. हा सामना डोळ्यासमोर ठेवून स्थानिक पोलिसांनी आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.या सामन्यासाठी संपूर्ण अहमदाबाद शहरात सर्व सुरक्षा यंत्रणांचे 11 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील. त्यात दहशतवादविरोधी दल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक , जलद कृती शक्ती दल , होमगार्ड आणि गुजरात पोलिसांचाही समावेश आहे.नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.

या क्रीडांगणाची क्षमता सुमारे 1.30 लाख प्रेक्षकांची आहे आणि सर्व तिकिटे विकली गेली आहेत. अशा स्थितीत हे मैदान खचाखच भरले जाणार आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान 7 हजारांहून अधिक पोलिस आणि सुमारे 4 हजार होमगार्ड कर्मचारी तैनात असतील.मलिक यांनी सांगितले की, एनएसजीची 3 टीम आणि अँटी ड्रोनची 1 टीम देखील असेल. बॉम्बशोधक पथकासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. याशिवाय सुरक्षेसंदर्भात बरीच तयारी करण्यात आली होती.

नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी

अलीकडेच अहमदाबाद पोलिसांना भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. 500 कोटी रुपयांव्यतिरिक्त, ज्या व्यक्तीने ईमेल पाठवला आहे त्याने तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी केली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे. एनएसजीसह इतर सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर.पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील , हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.

Exit mobile version